६५वी पुरुष व महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – हैद्राबाद – २०१७-१८

पुरुषांत महाराष्ट्रा अजिंक्य! सातव्यांदा मिळविले अजिंक्यपद.
महाराष्ट्राने “६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” पुरुष गटात गतविजेत्या सेनादलाचा चुरशीच्या लढतीत ३४-२९असा पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. आतापर्यंत महाराष्ट्राने या स्पर्धेत ६विजेतेपदे मिळविली होती. हे सातवे जेतेपद. स्पर्धेच्या इतिहासात २०वेळा महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक दिली होती. १३वेळा आपल्याला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले होते. २००७साली अमरावती(विदर्भ कबड्डी असो.)येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने जितेश जोशीच्या नेतृत्वाखाली दिल्लीला धूळ चारत विजय साजरा केला होता.त्यानंतर आज रिशांक देवाडीगाच्या कल्पक नेतृत्वाखाली बलाढ्य सेनादलाला चीतपट करीत महाराष्ट्र हा आनंदोत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने महाराष्ट्रातील तमाम कबड्डी शौकिनांना दिलेली नवर्षाची अनोखी भेटच म्हणावे लागेल.
महाराष्ट्राने सामन्याची सुरुवातच जोरदार आक्रमणाने केली. रिशांकने आपल्या पल्लेदार चढायाने सलग ३गुण घेत ३-०अशी आघाडी घेतली.त्यानंतर सेनादलाच्या मोनू गोयलने चढाईत गुण घेत संघाचे खाते खोलले. १४व्या मिनिटाला महाराष्ट्राने सेनादलावर लोण चढवित १३-०४अशी आघाडी घेतली. मध्यांतराला १७-१२अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. पण ती फार काळ टिकली नाही. मध्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला सेनादलाने महाराष्ट्राच्या लोणची परतफेड करीत १७-१९अशी आघाडी कमी केली. पुन्हा झटपट गुणांची कमाई करीत २२-२२अशी बरोबरी केली. सामना संपावयास ७-८ मिनिटे असताना सेनादलाने २५-२३अशी आघाडी घेतली. तेव्हा महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानात होते. या तीन खेळाडूत झटपट गुण घेण्याच्या नादात सोनू राखीव क्षेत्रात जाऊन स्वयंचीत झाला आणि महाराष्ट्राला “अव्वल पंकडीचे” दोन गुण मिळाल्यामुळे सामना २५-२५असा बरोबरीत आला.  पुढच्याच चढाईत महाराष्ट्राच्या खेळाडूंची पकड झाली. पुन्हा महाराष्ट्राचे तीन खेळाडू शिल्लक राहिले. त्या पकडीमुळे मोनूला जीवदान मिळाले. मोनू पुन्हा फाजील आत्मविश्वासाने चढाईला आला. पुन्हा त्याची तीन खेळाडूत ऋतुराज कोरवीने पकड करित महाराष्ट्राला दोन गुण मिळवून दिले. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २८-२६अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. महाराष्ट्राच्या विजयात आणखी एक टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे महाराष्ट्राचे प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांनी शेवटच्या काही मिनिटांत केलेला खेळाडू बदल. त्यांनी निलेश साळुंखेला बसवून तुषार पाटीलला खेळविण्याची चाल खेळली. ती यशस्वी झाली. त्यांनी दोन वेळा तिसरी चढई केली व दोन्ही वेळा संघाला १-१गुण मिळवून दिला. शिवाय वेळही पुरेपूर घेतला.त्याची जर पकड झाली असती तर मोनु गोयलला जीवदान मिळाले असते आणि सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. कारण हा सामना मोनू गोयल विरुद्ध महाराष्ट्र असाच झाला. मोनू गोयलने १८चढायात १बोनस व १४ झटापटीचे असे एकूण १५गुण मिळविले. एकदा तो स्वयंचित झाला, तर एकदा त्याची पकड झाली. पण या दोन्ही वेळा त्या “अव्वल पकड” ठरल्या.  सेनादलाच्या अन्य कोणत्याच खेळाडूंची मात्रा चालली नाही.प्रो- कबड्डीत सर्वात जास्त बोली लागलेला नितीन तोमरही सपशेल अपयशी ठरला. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडीगाने २बोनस व१४झटापटीचे असे एकूण १४गुण मिळविले. त्याच्या २सुपर रेड ठरल्या.२वेळा त्याची पकड झाली. गिरीश इरनाकने ५पकडी यशस्वी करीत त्याला छान साथ दिली. अंतिम सामन्यात आपला बचाव भक्कम झाला. त्यामुळेच नितीन तोमर, अजय कुमार यांना महाराष्ट्राचा बचाव भेदता आला नाही.या विजयामुळे महाराष्ट्र संघावर कबड्डी रसिकांकडून व सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
loading