“छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरला दुहेरी मुकुट.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरने पुरुष आणि महिला या दोन्ही गटाचे जेतेपद मिळवीत दुहेरी यश मिळविले. असा विक्रम करणारा मुंबई हा या स्पर्धेतील पहिलाच संघ ठरला.

इस्लामपूर, सांगली येथे जयंत पाटील खुले नाट्यगृहाच्या मैदानावर झालेल्या महिलां विभागात मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात अंतिम सामना रंगला. त्यात मुंबईने ३१-१७असा सहज विजय मिळवीत ” छत्रपती शिवाजी महाराज चषक” व रोख रु. एक लाख एकावन्न हजार (₹ १,५१,०००/-) आपल्या नावे केले. तर उपविजेत्या रत्नागिरीला चषक व रोख रु.एक लाख (₹ १,००,०००/-)वर समाधान मानावे लागले. महिला विभागात दबदबा असलेले पुणे, मुंबई उपनगर दोन्ही बलाढ्य संघ बादफेरीत पराभूत झाले.


मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी अंतिम सामन्यात मुंबई शहर ने सुरुवाती पासून आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरा पर्यत १५-०४ अशी भक्कम आघाडी मुंबई शहरने आपल्याकडे राखकी होती. क्षितिजा हिरवे व पूजा यादव यांनी चढाईत चांगला खेळ केला. तर पकडी मध्ये साक्षी रहाटे चमकली. रत्नागिरी कडून चढाईत श्रद्धा पवार व सिमरन यांनी मुंबई शहर ला प्रतिउत्तर देण्याचा चांगला प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. शेवटी मुंबई शहर ने ३१-१७ असा सामना जिंकत विजेतेपद पटाकवले.

पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध ठाणे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने ठाण्यावर ३४-३१ असा विजय मिळवीत रोख रु.एक लाख एकावन्न हजार( ₹ १,५१,०००/-) व ” छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. मुंबईने सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत भक्कम आघाडी मिळवली. ठाणे च्या हुकमी चढाईपटू महेश मोडकरच्या ४ वेळा पकडी करण्यात मुंबई शहर ला यश आले.येथेच ठाण्याची सामन्यावरील पकड ढिली झाली. पकडी मध्ये संतोष वारीक व संकेत सावंतने चांगल्या पकडी केल्या. मध्यंतरा पर्यत मुंबई शहर कडे १८-१० अशी आघाडी होती.

मध्यंतरानंतर ही मुंबई शहर ने सांघिक खेळ करत आघाडी वाढवली.पण ठाण्याने पुन्हा एकदा कमबॅक केले. एकवेळ १६-३२ असा पिछाडीवर पडलेल्या ठाणे संघाने २९-३४ अशी सामन्यात चुरस वाढवली. महेश मोडकरच्या सुपर रेड ने ठाणे सामन्यांत परत आला. पण मुंबई ने वेळ काढत आपली आघाडी कायम ठेवली.मुंबईच्या पंकज मोहिते व अजिंक्य कापरे यांनी चढाईत चांगला खेळ केला. ठाणे या सामन्यात सांधिक कामगिरीत कमी पडले. तसेच महेशला अन्य कोणाची साथ लाभली नाही. म्हणूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई शहर ने ३४-३१ असा सामना खिशात टाकला.

उपांत्य उपविजयी (पुरुष दोन संघ आणि महिला दोन संघ) दोन्ही विभागातील चार संघांना प्रत्येकी रोख रु. पंचवीस हजार व चषक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत साखळीतील पहिल्या सामन्यापासून विजयी संघाला रोख रु. ७,५००/- प्रदान करण्यात असले. त्यानुसार मुंबईच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी रोख रु. २,१३,५००/- ची कमाई केली.एवढी रोख रकमेची बक्षिसे वाटली, पण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई व पकड ही रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली नाही. यामुळे कबड्डी रसिकांचा व खेळाडूंचा विरस झाला.

स्पर्धेचा अंतिम निकाल
महिला विभाग
विजतेपद – मुंबई शहर
उपविजेतेपद – रत्नागिरी

पुरुष विभाग
विजेतेपद – मुंबई शहर
उपविजेतेपद – ठाणे


स्पर्धेचा अंतिम निकाल
महिला विभाग
विजतेपद – मुंबई शहर

विजयी मुंबई शहर संघ


उपविजेतेपद – रत्नागिरी

उपविजयी रत्नागिरी संघ

पुरुष विभाग
विजेतेपद – मुंबई शहर

विजयी मुंबई शहर संघ

उपविजेतेपद – ठाणे

उपविजयी ठाणे संघ
loading