६६ व्या पुरुष राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहज विजय


भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धाला डी. जी. तटकरे क्रीडानगरीत आज (२८जानेवारी) सुरुवात झाली.

मा. सुनील तटकरे यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या प्रसंगी, आमदार अनिकेत तटकरे, जयंत पाटील, रायगड जिल्हापरिषदचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर, सरसहकार्यवाह आस्वाद पाटील, पंचप्रमुख विश्वास मोरे यादी मान्यवर उपस्थित होते. लेझीम पथक, सांस्कृतिक कार्यक्रम व संघाची परेड अश्या पध्दतीने भव्यदिव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.

यजमान महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ यासामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्र संघाने जोरदार सुरुवात करत सुरुवातीलाच विदर्भ संघावर लोन टाकत १०-०० अशी सुरुवात केली. त्यानंतर ही विदर्भ संघाने काहीच प्रतिकार केला नाही. मध्यंतरापर्यत महाराष्ट्र संघाकडे ४०-०३ अशी भक्कम आघाडी होती.

महाराष्ट्र कडून चढाईत तुषार पाटील, अजिंक्य पवार यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली. तसेच गिरीश इरणक, अमीर धुमाळ व विकास काळे यांनी पकडीमध्ये जबरदस्त खेळ करत महाराष्ट्र संघाला ६४-१३ विजयी सलामी मिळवून दिली.

दुसऱ्या सामन्यात सेनादल संघाने मणिपूरचा ६७-०५ असा पराभव करत विजयी सलामी दिली. हरियाणाने छत्तीसगडचा ६७-२४ असा धुव्वा उडवला. कर्नाटक विरुद्ध बीएसनेल यांच्यात चांगली लढत झाली. कर्नाटकाने ५७-४५ असा विजय मिळवला.


loading