२९वी किशोर/ किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – अलिबाग

मुं.उपनगर व कोल्हापूर अजिंक्य!
कोल्हापूरला समिश्र यश!
मुं.उपनगर व कोल्हापूर यांनी ” २९व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” किशोर व किशोरी गटाचे अजिंक्यपद पटकाविले. कोल्हापूर दोन्ही गटात अंतिम फेरीत दाखल झाले होते,परंतु त्यांना समिश्र यशावर समाधान मानावे लागले. किशोरी गटात गत विजेते पुणे उपांत्य फेरीत, तर परभणी अंतिम फेरीत पराभूत झाले.
अलिबाग-रायगड येथील पी.एन.पी. शैक्षणिक संकुलात झालेल्या मुलींच्या चुरशीने खेळला गेलेल्या अंतिम सामन्यात मुं. उपनगरने कोल्हापूरचे कडवे आव्हान २७-२३ असे मोडून काढत “स्व. सौ.राजश्री चंदन पांडे” फिरता चषक आपल्याकडे खेचून आणला. मध्यांतराला १७-०९अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या उपनगरला नंतर मात्र कोल्हापुरने चांगलेच झुंजविले. ५मिनिटे शिल्लक असताना २२-१६ अशी उपनगरकडे आघाडी होती. शेवटचे दीड मिनिटं शिल्लक असताना उपनगरचे तीन खेळाडू मैदानात होते व अवधी दोन गुणांची आघाडी त्यांच्याकडे होती. या संधीचा लाभ कोल्हापूरला घेता आला नाही. तीन खेळाडूत कोल्हापूरच्या चढाईपट्टूची अव्वल (सुपर कॅच) झाली. येथेच सामना पुन्हा उपनगरच्या बाजूने झुकला. करीना कामतेकर,शुभदा खोत, शर्वरी गोडसे यांच्या कल्पक व संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ऋतुजा कडलग,प्रतिक्षा पाटील, प्रांजल पवार यांनी कोल्हापूरचा पराभव टाळण्यासाठी शर्थीची लढत दिली.
मुलांच्या अंतिम लढतीत कोल्हापुरने गत विजेत्या परभणीचा दुबळा प्रतिकार ३६-१९ असा मोडून काढत “स्व.प्रभाकर नारायण पाटील”फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत झंजावाती खेळ करणाऱ्या परभणीला अंतिम सामन्यात मात्र सूर सापडला नाही. कोल्हापुरने सुरुवाती पासूनच आक्रमक खेळ करीत मध्यांतरा पर्यंत १७-०८अशी आपल्याकडे आघाडी राखली होती. नंतर देखील सावध खेळ करीत ही आघाडी वाढवित १५गुणांनी सामना आरामात जिंकला. या विजयात तेजस पाटील याच्या जोशपूर्ण चढायाचा सिंहाचा वाटा आहे. त्याला अभय बाबर यांनी चढाईत तर सौरभ इंगळे, अमोल चव्हाण यांनी पकडीत मोलाची साथ दिली. परभणीच्या माहिब शेख, हनुमान शिंदे, करणं गायकवाड यांची या सामन्यात डाळ शिजली नाही.
या अगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात मुं. उपनगरने मुं. शहरला ३८-३४,तर कोल्हापुरने गत विजेत्या पुण्याचा ४३-२६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापुरने ठाण्याला ४५-३१, तर परभणीने मुं.शहरला २७-२२असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
loading